धाराशिव – महाराष्ट्रात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीविरोधात आणि राज्य सरकारच्या या प्रश्नाकडे असलेल्या दुर्लक्षतेविरोधात धाराशिवकरांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विद्यार्थिनींसह अनेक महिलांनी ‘बलात्कार्यांना फाशी द्या’, ‘बालिकांना न्याय द्या’ अशा घोषणा देत न्यायाची मागणी केली.
बदलापूर, कोलकाता आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या धाराशिवकरांनी या नराधमांना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीला काळिमा फासणारे कृत्य ठरवत, अशा नराधमांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पवित्रा मोर्च्यात सहभागी महिलांनी व्यक्त केला.
३१ डिसेंबर २०२४ पूर्वी या नराधमांना फाशीची शिक्षा न झाल्यास शासनाच्या लाडक्या बहिणी मयत बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी अन्न-पाणी त्याग करून उपोषण करतील, असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले.
मोर्चात सहभागी असलेल्या एका विद्यार्थिनीने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिने विचारले की, जर या घटना एखाद्या अधिकारी किंवा मंत्र्याच्या मुलीसोबत घडल्या असत्या तर सरकारने कठोर पावले उचलली असती का? एवढ्या घटना घडूनही आरोपींवर कठोर कारवाई का होत नाही? यामुळे मुली घराबाहेर पडणेच बंद करतील, अशी भीती तिने व्यक्त केली.
विधिज्ञ भाग्यश्री कदम यांनी देशात महिला असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली. महिलांवर होणारे अमानुष अत्याचार थांबले नाहीत तर महिलांकडूनच नराधमांना प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा त्यांनी दिला. स्वतंत्र भारतात महिलांवर अत्याचार होत असल्याबद्दल सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
श्वेता दुरुगकर यांनी बालिकांना लहान वयातच ‘गुड टच बॅड टच’ शिकवण्याची गरज व्यक्त केली. शाळेत मुलांची मुलाखत घेतली जाते तशीच शाळेतील कर्मचाऱ्यांचीही मुलाखत घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. राज्य सरकारने सत्ताधारी पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना आवर घालण्याची मागणीही त्यांनी केली.