धाराशिव जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या सावटाखाली दबलेली जनता अखेर मोकळा श्वास घेऊ लागली आहे. एका भ्रष्ट जिल्हाधिकाऱ्याच्या बेधडक बदलीने जिल्ह्यातील विकासाच्या मार्गावर पडलेली अडथळ्यांची शृंखला हटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
धाराशिवने आजवर अनेक जिल्हाधिकारी पाहिले, पण भ्रष्टाचाराला निर्लज्जपणे प्रोत्साहन देणारा असा जिल्हाधिकारी प्रथमच अनुभवला. जनतेच्या भल्यासाठी नेमल्या गेलेल्या या अधिकाऱ्याने स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्ह्याचा वापर केला. पण आता, या चक्रव्यूहातून सुटण्याची वेळ आली आहे.
बोगस प्रमाणपत्रावर जिल्हाधिकारी?
सोलापूरला मोठ्या थाटात शिफ्ट झालेल्या आणि संशयास्पद बोगस प्रमाणपत्रावर जिल्हाधिकारी बनलेल्या ओंबासे यांची चौकशी आता केंद्रीय यंत्रणांकडून (ED) व्हायलाच हवी! कारण हा फक्त एक जिल्हाधिकारी नसून, संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला गालबोट लावणारा घटक आहे. सोलापूरकर आता याला आपल्या जिल्ह्यात थारा देणार की तिथूनही हकालपट्टी होणार, हे पाहणं रंजक ठरेल.
निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप: सत्याचा विजय!
उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे यांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, ज्यामुळे ओंबासे यांच्या चौकशीला सुरुवात झाली. मात्र, स्वतःच्या बचावासाठी ओंबासे यांनी ढवळे यांना निलंबित करण्यासाठी एका महिलेला पुढे करून राजकीय खेळी खेळली. पण सत्य लपवता येत नाही! ढवळे यांनी निवडणूक आयोगाला स्पष्टपणे सांगितले की, ओंबासे जिल्हाधिकारीपदावर असताना निष्पक्ष चौकशी होणे अशक्य आहे. आयोगानेही या मताशी सहमती दर्शवून राज्य सरकारकडे बदलीची शिफारस केली. आणि अखेर, जनतेच्या विजयाची घंटा वाजली – भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून ओंबासे यांची तातडीने हकालपट्टी झाली!
धाराशिवची नवी पहाट
ही केवळ एका व्यक्तीची बदली नाही, तर धाराशिवच्या नव्या भविष्याची नांदी आहे. आता प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा करण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचार, बेफिकिरी आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ही सुरुवात आहे.
जनतेने आता जागरूक राहून नवे अधिकारी कसे काम करतात, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण भ्रष्टाचाराच्या सावटाखाली जिल्ह्याचा विकास ठप्प होतो, आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना अडथळे येतात. धाराशिवच्या मोकळ्या हवेत आता भ्रष्टाचारमुक्त शुद्ध प्रशासनाचा सुवास दरवळू लागलाय!
हा विजय कोणाचाही नाही – हा सत्याचा, न्यायाचा आणि धाराशिवच्या स्वाभिमानाचा विजय आहे!