धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील ढोकी आणि भूम पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सौर प्रकल्पातील कॉपर केबल चोरी आणि अवैध वाळू साठ्याच्या दोन घटनांप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तावरजखेडा शिवारातील नेत्रा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या सौर प्रकल्पात २९ जुलै रोजी पहाटे १ ते सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली. शेत गट क्रमांक ४८, ६६, ७१ व ७२ मधील सौर प्लेटला जोडलेले १,००५ मीटर लांबीचे काळ्या व लाल रंगाचे कॉपर केबल वायर, अंदाजे ५२ हजार २०९ रुपयांचा ऐवज, अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी प्रग्याशोद प्रमोदकुमार दास (रा. कटक, ओडिशा, सध्या तावरजखेडा) यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू साठ्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात चिंचपूर ढगे येथील बिरोबा मंदिरासमोरील पडीक जागेत सुमारे ११ ब्रास वाळू (किंमत ७३ हजार २१६ रुपये) कोणतीही शासकीय परवानगी न घेता चोरीच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी शामबाला कालीदास खोत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०३(२) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या प्रकरणात बेलगाव येथील बाणगंगा नदीपात्रालगत सुमारे ५ ब्रास वाळू (किंमत ३३ हजार २८० रुपये) बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. ग्राम महसूल अधिकारी जया महादेव सुतार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०३(२) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.




