धाराशिवच्या तहसील कार्यालयात तहसीलदार मॅडमने सरकारी केबिनचं रूपांतर थेट ‘आपकी अदालत’मध्ये केल्याची बातमी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या चबुतऱ्यावर बसलेल्या “वाजे सिस्टर” यांनी न्यायदानाच्या जागेला चक्क न्यायालयाचा दरबार बनवलंय, पण त्याचा हेतू न्यायाधीशाचा रुबाब मिरवण्याचा वाटतोय!
ही केबिन पाहता, एखाद्या ऐतिहासिक महालातील चबुतऱ्याची आठवण होते. चबुतऱ्याचा उंचीवर खास लक्ष, सामान्य जनतेपासून स्वतःला “फुटभर” उंच ठेवण्याचा हा प्रकार, अनेकांना ‘समानतेच्या तत्त्वाचा’ विसर पडल्याचं सूचित करतो. “शासनाने कामासाठी दिलेला केबिन, तरीही एवढा रुबाब का?” हा प्रश्न जनतेच्या मनात घर करून बसलाय.
केबिनला चारही बाजूंनी बंदिस्त करून ‘सुरक्षित कटघरा’ तयार करण्यामागे यांचा उद्देश फक्त “फटके बसण्यापासून संरक्षण” असावा, अशी शंका लोकांना वाटू लागली आहे. तहसीलदारांसाठी सरकारनं कामाची जागा दिलीय, पण “वाजे सिस्टर”नी ती जागा ‘वैभव प्रदर्शन’ आणि ‘सामान्यांपेक्षा वरच्या स्तराचं भासवण्याचं साधन’ बनवलंय.
या अनोख्या “आपकी अदालत” प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच आपली नाराजी व्यक्त केली होती. “सर्व अधिकारी समान आहेत, मग तहसीलदारांनी असा खास चबुतरा कशासाठी?” असा सवाल त्यांनी केला होता.
आता धाराशिवमधील जनता विचारते, “जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे असं चबुतऱ्याचं ‘विशेष आसन’ नाही, मग वाजे सिस्टरलाच कशाचं एवढं भय?”
तहसील कार्यालयात लाखो रुपयांचा चुराडा करून नियमबाह्य पद्धतीने उभारलेला हा चबुतरा म्हणजे “सामान्यांचे कररूपाने भरलेले पैसे रुबाबासाठी उधळले जाण्याचं उदाहरण” आहे.
धाराशिवकर आता ठाम मत व्यक्त करत आहेत, “हे ‘आपकी अदालत’ बंद करावं, आणि वाजे सिस्टरला सरकारी भूमिकेचं भान द्यावं!”
शेवटी, सरकारी काम आहे म्हणून म्हणावं, पण इथे तहसीलदाराचं ‘केबिन ड्रामा’ पाहायला मिळालं!