कळंब – कळंब तालुक्यातील गौर येथील ७० वर्षीय वृद्धाला खोटे पोलीस बनून अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना १३ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत भानुदास थोरवे असे फिर्यादी वृद्धाचे नाव आहे. ते १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळून शिक्षक कॉलनीकडे जात असताना दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून थोरवे यांना त्यांच्या हातातील अंगठी काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. थोरवे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून अंगठी पिशवीत ठेवली. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्याकडून पिशवी हिसकावून घेतली आणि त्यातील सोन्याची अंगठी चोरून पळून गेले.
थोरवे यांनी या घटनेची तक्रार २० जानेवारी रोजी कळंब पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१९ (२), ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.