कळंब: कळंब नगरपरिषदेत नुकतीच रुजू झालेल्या एका महिला सफाई कामगाराने एका लिपिकावर गंभीर आरोप केला आहे. नोकरी लावण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आणि लाचेची रक्कम न दिल्यास शरीर सुखाची मागणी होत असल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संबंधित महिला कामगाराने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दिला आहे. रेशमा शब्बीर शेख असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. लाड समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने रेशमा यांना १३ जानेवारी २०२५ रोजी सफाई कामगार पदावर नोकरी मिळाली. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर आस्थापना विभागातील लिपिक कैलास दत्तात्रय हाके यांनी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप रेशमा यांनी केला आहे.
हाके यांनी रेशमा यांना सांगितले की, त्यांनी आणि आस्थापना प्रमुख अजय काकडे यांनी मिळून त्यांना नोकरी लावली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अशी एकूण एक लाख रुपये द्यावे लागतील. रेशमा यांनी लाच देण्यास नकार दिल्यानंतर हाके यांनी त्यांना फोन करून आणि कामाच्या ठिकाणी येऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.
याप्रकरणी रेशमा यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देऊन हाके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.