धाराशिव जिल्ह्यात, विशेषतः तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई, मुर्टा, बारुळ, होर्टी, गंधोरा आदी गावांमध्ये पवनचक्की उभारणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेकेदारांकडून गुंडाच्या मदतीने धमकावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या गुंडगिरीत जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तर यापूर्वी बारुळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती.
तुळजापूर तालुक्यात Renew कंपनीकडून पवनचक्की उभारणीचे काम सुरू असून, त्याचा मुख्य ठेकेदार रजा मुराद याने अमोल लाखे पाटील यास ठेका दिला आहे. अमोल लाखे पाटील हाच गुंडगिरी करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलीसांना हाताशी धरून हे ठेकेदार बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याचा आरोप होत आहे. पवनचक्की उभारणी करताना अनेक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचेही उघडकीस आले आहे.
नियमांची होणारी पायमल्ली:
- पवनचक्कीची जमीन अकृषी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावा लागतो. मात्र, या प्रक्रियेत लाखो रुपयांची लाचखोरी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
- खोदकाम करताना तहसीलच्या गौण खनिज विभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र, अधिकाऱ्यांना लाच देऊन ही परवानगी मिळवली जात आहे.
- पवनचक्की उभारणी करताना एक किलोमीटर अंतरावर घर किंवा वस्ती नसावी, दोन पवनचक्क्यांमध्ये सव्वा किलोमीटर अंतर असावे आणि हायवेपासून किमान सव्वा किलोमीटर अंतर असावे, असे नियम आहेत. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक:
- एक पवनचक्की उभारणीसाठी ११ गुंठे जागा लागते, मात्र ७ एकर जागा अधिग्रहण केली जाते. शेतकऱ्यांना किमान ४५ लाख रुपये दिले पाहिजेत, मात्र २५ ते २९ लाख रुपये दिले जात आहेत. उर्वरित रक्कम दलाल गिळंकृत करीत आहेत.
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता जातो, त्यांना प्रति गुंठा ३० हजार रुपये द्यायला हवेत. मात्र, १५ हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम दलाल खाऊन टाकत आहेत.
या सर्व प्रकारात शासकीय अधिकारी, पोलीस आणि दलाल यांची साठगाठ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.