लोहारा – खेड गावातील एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्याला मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक रामराव गव्हाळे (वय ५९, रा. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जिलानी महबूब शेख (रा. खेड) हा दारूच्या नशेत त्यांच्या शेतात (गट क्रमांक ६१/१) आला आणि त्यांच्या ४ वर्षांच्या तांबड्या रंगाच्या कुत्र्याला काठीने मारहाण करून ठार मारले.
या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर जिलानी महबूब शेख विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२५ (मारहाण) आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(एल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.