उमरगा – उमरगा तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. डिग्गी येथील नागेश सुभाष लोहार यांच्याकडून ४५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच, तडकल येथील चॉदसाब उमरसाब मुल्ला यांच्याकडूनही ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी नागेश लोहार हे आपल्या घरासमोर ४५०० रुपये किमतीची ४५ लिटर गावठी दारू विक्री करत असताना पकडले गेले. त्यानंतर काही वेळातच बसवेश्वर चौकात चॉदसाब मुल्ला यांच्याकडून ३००० रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. उमरगा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
डिग्गी गावात अवैध धंद्यांविरोधात माजी तंटामुक्त अध्यक्षांचे आमरण उपोषण
उमरगा तालुक्यातील डिग्गी गावातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी माजी तंटामुक्त अध्यक्ष विरेश जमादार यांनी आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गावातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे होणारे सामाजिक आणि आर्थिक नुकसान रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
विरेश जमादार यांच्या उपोषणानंतर पोलिसांनी डिग्गी येथे अवैध धंद्याविरुद्ध छापेमारी सुरु केली आहे.