उमरगा : मुंबई-हैदराबाद महामार्गावर दस्तापूर येथे आज दुपारी एका मोटारसायकल आणि ईरटीका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ४.१० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (क्रमांक MH.13.CF.5194) आणि ईरटीका कार (क्रमांक MH.14.LJ.3484) यांची रस्ता ओलांडताना समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार गणेश शंकर पांचाळ (३५ वर्षे, रा. नळदुर्ग) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या मोटारसायकलस्वार सुयश सुधीर पुराणिक (२८ वर्षे, रा. नळदुर्ग) हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धाम रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमी सुयश पुराणिक यांना उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.