धाराशिव: येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव येथे एका घरात मोठी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 15,79,600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) या गुन्ह्याचा तपास करत आरोपीला अटक केली आहे.
रामभाऊ गहिनीनाथ नवले यांच्या घरी चोरी
वडगाव येथील रामभाऊ गहिनीनाथ नवले हे त्यांच्या शेतात गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली.
पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक कासार आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. सूरज दादासाहेब शिनगारे (रा. शेलगाव) याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चोरीचा मुद्देमाल जप्त
आरोपीच्या चौकशीनंतर पोलिसांनी चोरी केलेला सर्व मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 18 तोळे सोन्याचे दागिने, 40 हजार रुपये रोख आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण 15,09,600 रुपयांचा माल आहे.
पोलिसांचे यश
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण आणि त्यांच्या सहकार्यांनी या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली.