मुंबई : पत्नीकडील नातेवाईकांनाही कुणबी दाखला द्या या जरांगे – पाटील यांच्या नव्या मागणीनंतर सरकारची आणि त्यांची बोलणी फिस्कटली आहेत. ही बोलणी करण्यासाठी राज्य सरकारचे काही मंत्री 21 डिसेंबरला जरांगेंकडे वाटाघाटींना गेले होते. यावरच बोट ठेवत सरकारमधलेच मंत्री छगन भुजबळ यांनी उपरोधिक टीका केली आहे. जरांगेंच्या अंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले बांधा असं खोचक वक्तव्य भुजबळांनी केलंय. सरकार आणि जरांगेंची बोलणी फिस्कटल्यावर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी सविस्तर भाष्य केलंय. “सरकारने काय वाटाघाटी केली? हे मला माहीत नाही. पण मला स्वतःला हे योग्य वाटत नाही. सुरुवातीला जरांगे पाटील म्हणाले, निजामशाहीतील लोकांना दाखले द्या, ते सरकारने मान्य केलं. नंतर मराठवाड्यातील लोकांना दाखले द्या, तेही मान्य झाले. मग संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी मागणी केली, तीही मान्य झाली. आता ते आईकडच्या लोकांना दाखले द्या, आईकडच्या नातेवाईकांना दाखले द्या मग याही मागण्या आता मान्य करा”, असंही भुजबळ म्हणाले.
ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे – पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली आहे. तर, जरांगेंच्या या मागणीलाच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोध केलाय. त्यामुळे गेले काही दिवस हे दोन्ही नेते एकमेकांवर सभा – पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाष्य करतायत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला असून आता पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
‘अंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले बांधा’
छगन भुजबळ म्हणाले, “आपण जरांगेचे ऐकलं पाहीजे. नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील. आणखी काहीतरी करतील. त्यामुळे आपण व्याहींचे व्याही, त्यांचे व्याही यांना ताबडतोब आरक्षण दिलं पाहीजे. माझं तर म्हणणं आहे की, मंत्री महोदय सारखे सारखे त्यांना भेटायला अंतरवाली सराटी येथे जात आहेत. ते फार अडचणीचं होतं. त्यामुळे तिथे दोन-चार सरकारी बंगले बांधले पाहीजेत. मुख्य सचिवांचे एक कार्यालय तिथे स्थापन केले पाहीजे. जरांगेंनी सांगितल्यानंतर मंत्र्यांनी ऑर्डर काढून मुख्य सचिवांनी त्याला तात्काळ मंजुरी देऊन टाकावी. तसेच माजी न्यायाधीशांच्या समितीचेही कार्यालय तिथे थाटावे, म्हणजे जरांगे म्हणतात त्याप्रमाणे अहवाल तयार करता येईल.”
‘देवही जरांगेंना घाबरतो’
“जरांगे पाटील यांच्या मागण्या तर्काला धरून आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारच त्यांचे काही ऐकत नाही, असे चित्र निर्माण झालेले दिसते. जरांगेच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहीजेत. जरांगेनी सरकारला वेठीस धरले आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता भुजबळ म्हणाले की, जरांगेनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारनेच जरांगेना वेठीस धरले आहे. तसेच मी याआधी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेत असून जरांगेच्या अभिनव कल्पनांना मान्यता देत आहे. कायदे बदलून टाकावेत. पुढच्या मेळाव्यात मी त्यांच्याबाजूने भाषणे करणार आहे.”, असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी लगावला.
‘जरांगे SC/STतूनही आरक्षण मागू शकतात’
“जरांगे पाटील यांच्यावर बोलत असताना भुजबळ म्हणाले की, ही माझी हतबलता म्हणा, मी घाबरलो म्हणा… काहीही म्हणा. पण जरांगे यांनी उद्या एससी / एसटीमध्ये आरक्षण मागितले तर त्यातही त्यांना आरक्षण देऊन टाका, असे भुजबळ म्हणाले. तसेच आता आरक्षणाच्या बाबतीतच नाही, तर पुढे ते शेतकरी, शिक्षण आणि विकासाच्या बाबतीतही सूचना देतील. त्या आपल्याला ऐकायला हव्यात. जरांगे यांच्यापाठी मराठा समाजाचे एवढे मोठे पाठबळ आहे, ते सरकारच्या विरोधात गेले तर कसं होईल? सरकारला काही भीती वाटते की नाही? त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहीजेत”, असेही भुजबळ म्हणाले.