धाराशिव: “बहीण लाडकी” योजना म्हणजे निवडणुकीपूर्वी सर्वच नेत्यांना आठवणारी, पण सत्तेत आल्यावर बहुतेकांसाठी विस्मरणात जाणारी अशी एक चमत्कारी योजना! साखर शब्द, गोडगोड वचनं आणि राख्यांनी भरलेले हात – हे सगळं संपताच आता काही बहिणींना अनुदानासाठी ‘परीक्षा’ द्यावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांत प्रशासनाने तब्बल २२७४ अर्ज फेटाळून लावले, जणू काही बहिणींना सांगितलं – “अगं, तुझं पात्रता प्रमाणपत्र हरवलंय!” काही महिलांनी मात्र स्वतःहून अनुदानाला रामराम ठोकला, दहा बहिणींनी अर्ज दिले की आम्हाला ह्या पैशांचा मोह नाही, आणि दोन अतिशय आदर्श बहिणींनी मिळालेलं संपूर्ण अनुदान परत केलं! (ह्यांना खरंच टाळ्या द्यायला हव्यात!)
नव्या अटी अनुदानाच्या ‘स्पीड ब्रेकर’!
योजनेला गती मिळावी म्हणून प्रशासनाने काही नवीन निकष लावले आहेत:
✔️ चारचाकी वाहन असणाऱ्या बहिणी – बाहेर! (कारमध्ये मोकळ्या जागा असल्या तरी योजना त्यांना माफ करणार नाही.)
✔️ संजय गांधी निराधार आणि पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी – बाहेर! (दोन जागी हात मारणं योग्य नाही, असं सरकारचं मत.)
✔️ निवडणुकीआधी हातभर राख्या बांधून फोटो काढणाऱ्या बहीण-प्रेमी नेत्यांना – जबाबदारी नाही! (हे विशेष उल्लेखनीय.)
महिला बचत गटांच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींची ‘गुप्त’ उपस्थिती!
महिला बचत गटाच्या कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग हल्ली विलोभनीय दिसत आहे. मागच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यक्रमात ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असं ठासून सांगणारे नेते आता कुठे आहेत? बहुधा, त्यांच्यासाठी बहीण फक्त निवडणुकीपुरती लाडकी आणि नंतर साक्षात पद्मिनी एकादशी!
ऑनलाइन ‘तपासणी’ – सरकारच्या यंत्रणेचा आविष्कार!
योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक अर्जदाराची आता ऑनलाइन पुनर्तपासणी होणार आहे. मंत्रालयात बसलेले अधिकारी सुसाट इंटरनेटवर त्या सर्व अर्जांचा ताळमेळ लावत आहेत. “ही योजना होती तरी काय?” असा प्रश्न काही अधिकाऱ्यांनी खुद्द स्वतःलाच विचारला आहे!
“अनुदान हवंय? मग क्रॅश कोर्स करा!”
प्रत्येक नव्या योजनेत नवीन नियम येतात, आणि योजनांची पात्रता ठरवणं जणू परीक्षा देण्याइतकंच कठीण होतं. काही महिलांना आता वाटतंय की “अनुदान मिळवण्यासाठी स्वतंत्र क्लास सुरू करावा का?” – कारण अर्ज मंजूर व्हायचा नाही, नवा नियम लागू होतोच!
निष्कर्ष:
“लाडकी बहीण” आता “परिक्षार्थी बहीण” झाली आहे. अनुदानासाठी पात्र राहायचं असेल, तर बहीण नव्हे, IAS परीक्षार्थी मानसिकता ठेवायला हवी!