तुळजापूरचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, वय वर्ष ९०, आपल्या जुन्या लढाऊ शैलीत पुन्हा एकदा राजकारणाच्या रणांगणात उतरायला सज्ज झाले आहेत. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आश्चर्य व्यक्त करत आहेत, की मागील दोन निवडणुका चव्हाणांनी “ही शेवटचीच” म्हणून गाजवल्या, पण अजूनही निवडणुकीत उतरण्याचा त्यांचा जोश काही कमी झालेला नाही. माजी मंत्री, चार वेळा आमदार आणि काँग्रेसचे आधारस्तंभ असलेल्या चव्हाण यांना भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांनी मागील निवडणुकीत आस्मान दाखवले होते, पण चव्हाणांनी पराभव मानला नाही. उलट ते म्हणतात, “ही शेवटचीच निवडणूक असेल.”
अणदूरचे रहिवासी आणि श्री खंडोबाचे निस्सीम भक्त असलेले चव्हाण यांची भक्ती तुळजापूर तालुक्यात प्रसिद्ध आहे. पण खंडोबावर असलेली भक्ती असली तरी, त्यांनी कधी साधं सभागृहसुद्धा बांधलेलं नाही हा कटाक्ष तुळजापूरकर लावतात. पण लोकं काहीही बोलोत, चव्हाणांचा उत्साह आणि आत्मविश्वास अजूनही कमी झालेला नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, “तुळजापूरच्या जनतेने मला संधी दिली तर मी शेवटचा वार करण्यास तयार आहे.”
कुसळी गवताचा तालुका आणि चार रणनायक
तुळजापूर तालुका कधीकाळी कुसळी गवताने प्रसिद्ध होता. या गवतासारखं टिकाऊ असलेलं नेतृत्व इथं होतं – मधुकरराव चव्हाण, नरेंद्र बोरगावकर, सी.ना. आलुरे गुरुजी, आणि शिवाजीराव बाभळगावकर. या चार लोकांनी मिळून तालुक्यात साखर कारखाना आणि सूतगिरणी उभी केली. तुळजाभवानी साखर कारखाना आणि तुळजाभवानी सूतगिरणी हे या तालुक्याचे वैभव होते. साखर कारखान्याचे अध्यक्ष बोरगावकर आणि उपाध्यक्ष चव्हाण होते, तर सूतगिरणीच्या अध्यक्षपदावर स्वतः चव्हाण विराजमान झाले. पण चव्हाण यांनी आलुरे गुरुजी आणि बाभळगावकर यांना बाजूला करत त्यांच्याकडे धतुर्याचा ढोस दिला.
सुरुवातीला कारखाना आणि सूतगिरणी चांगली चालली होती. पण १५ वर्षांनंतर या प्रकल्पांवर प्रचंड कर्ज झाले. साखर कारखाना भंगारात बदलला, सूतगिरणी बंद पडली. शेवटी सी.ना. आलुरे गुरुजींना हा भंगार दिला गेला, पण तेही काही करू शकले नाहीत. कर्ज वाढतच गेले, आणि शेवटी चव्हाणांनी कारखाना भाजप नेते सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ला भाड्याने दिला.पण येथे राजकारण आडवं आलं.
संपत्तीचा खेळ – ‘घराणेशाहीचं वारस’
साखर कारखान्यावर कर्ज झाले, म्हणून ते राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्या ‘दृष्टी’ संस्थेला दिले गेले. पण दोन वर्षातच हा करार रद्द करण्यात आला. त्यानंतर कारखाना काही काळ बंदच पडला. पण चव्हाणांनी हार मानली नाही. त्यांनी कारखान्याचं अध्यक्षपद आपल्या पुत्र सुनील चव्हाण याच्या गळ्यात टाकलं आणि त्याला ‘मालक’ बनवलं. १५० कोटींच्या कर्जात असलेला हा कारखाना शेवटी ‘गोकुळ’च्या नावावर भाड्याने घेण्यात आला.
शेतकऱ्यांचे पैसे देण्यास असमर्थ राहिल्यामुळे लोकांनी चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढला. अनेक आंदोलनं झाली, पण त्याचा परिणाम काही झाला नाही. शेवटी चव्हाणांनी त्यांच्या मुलाला भाजपमध्ये ढकललं. सुनील चव्हाण भाजपमध्ये गेले, पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाणांचा हा डाव ओळखून त्यांना मदत करण्यास नकार दिला.
फडणवीसांवर उलटला बाण
भाजपने मदत केली नाही, म्हणून आता मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीसांवर उलट आरोप करत, “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं. हे पाप त्यांना फेडावं लागेल,” असं ते ठणकावून सांगत आहेत. पण प्रश्न हा आहे की, चव्हाणांच्या कारखान्यात झालेलं ‘पाप’ कोण फेडणार?
चव्हाण यांच्या कारखान्यातल्या भ्रष्टाचाराचं काय होणार, आणि शेतकऱ्यांचे पैसे कोण देणार, हे अजूनही अनुत्तरित प्रश्न आहेत. पण हे मात्र निश्चित आहे की, मधुकरराव चव्हाण अजूनही ‘शेवटची निवडणूक’ लढवण्यास तयार आहेत, आणि तुळजापूरच्या राजकारणात त्यांची खुमखुमी कमी होणं केवळ अशक्य आहे!