धाराशिव- राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी येथील डॉ.प्रतापसिंह पाटील यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीचे पत्र दिले आहे.यावेळी सरचिटणीस प्रशासक आदितीताई नलवडे , कार्यालय सरचिटणीस रविंद्र पवार,नवी मुंबई प्रभारी प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ.प्रतापसिंह पाटील हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते.त्यावेळेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नजिकचे मानले जात होते.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर देखील डॉ.प्रतापसिंह पाटील हे खा.शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करणारे पहिले नेते होते.
या एकनिष्ठतेची दखल घेऊन त्यांना प्रदेश पातळीवर अत्यंत महत्वाचे सरचिटणीसपद मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश पातळीवर सरचिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भूम परंडा वाशी व कळंब-धाराशिव या दोन विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात जाळे आहे.त्यामुळे ते सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला जोडले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार , राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे,प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील,माजी मंत्री राजेश टोपे,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व आ.रोहित पवार यांच्यामुळे मला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल सर्वांचे आभार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन मी प्रयत्न करणार आहे.
– डॉ.प्रतापसिंह पाटील
सरचिटणीस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट ),महाराष्ट्र राज्य