तुळजापूर – “उमेदवारी लवकरच मिळणार” या आशेने तुळजापूर विधानसभा निवडणुकीच्या तयारीत प्रचंड खर्च करणारे राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे उर्फ भाऊना नुकतीच काँग्रेसकडून नकारघंटा मिळाली. पण हे भाऊ, साधे खचणारे नाहीत! त्यानंतर त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दार ठोठावायला सुरुवात केली आहे. आता भाऊंना मनसेकडून उमेदवारी मिळणार का? हा प्रश्न तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील गल्लीबोळात चर्चेचा विषय ठरला आहे.
तुळजापूरच्या या निवडणुकीत काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर करून, भाऊंच्या आशा आकांक्षा आणि भरमसाठ खर्चाला धक्का दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी मेळावे, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’चे कार्यक्रम, आणि तरुणांसाठी रोजगार मेळावे अशा कार्यक्रमांची लयलूट करणारे भाऊ उमेदवारी मिळवण्यासाठी साऱ्या हिकमती वापरत होते. पण “निष्ठा भारी, पैसा हलका” असं काँग्रेसचं सूत्र या वेळी त्यांना अडचणीत आणलं.
अनेक उद्योगांमध्ये जम बसवणारे, मुंबई आणि सोलापूरमध्ये बिल्डर म्हणून प्रसिद्ध असणारे भाऊ राजकारणात मात्र नेहमीच बाजूला पडले आहेत. त्यांना प्रेमाने ‘भाऊ’ म्हणतात खरे, पण त्यांची उमेदवारीची गोष्ट मात्र “अधुरी राहिलेली कहाणी” झाली आहे. विधान परिषदेत भाजपकडून पराभूत झाल्यापासून ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करूनही निवडणूक हरलेत, आणि आता राष्ट्रवादीत राहून उमेदवारीला पारखे झालेत. त्यामुळे “उमेदवारी हवी तर दरवर्षी पक्ष बदलायला हरकत नाही,” अशी म्हण लोकं आता वापरायला लागली आहेत.
अशोक भाऊ मात्र ठाम आहेत – “मनसेचा झेंडा उचलला तरी यंदा लढणार!” अशीच मर्दुमकी दाखवत, त्यांनी आत्तापासूनच प्रचाराचा सुळसुळाट सुरू केला आहे. “भाऊ लढणार, बदल घडणार!” ही टॅगलाईन मनसेच्या झेंड्याखाली बघायला मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.