उमरगा – उमरगा तालुक्यातील हंद्राळवाणी येथे घरगुती वादातून 55 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मृताचे नाव विश्वनाथ माणिक पाटील असून त्यांच्यावर लाथाबुक्यांनी, बाजेच्या लाकडी माचोळा आणि काठीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बालाजी शिवदर्शन पाटील, कृष्णा शिवदर्शन पाटील आणि शिवदर्शन काशीनाथ पाटील यांनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता विश्वनाथ पाटील यांच्यावर हल्ला केला. घरगुती वाद आणि मागील भांडणाचे कारण या हल्ल्यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी विश्वनाथ पाटील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच बाजेच्या लाकडी माचोळा आणि काठीनेही त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात विश्वनाथ पाटील गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या हल्ल्यात विश्वनाथ पाटील यांचा मुलगा नागेश पाटील हा देखील जखमी झाला आहे. या प्रकरणी विश्वनाथ पाटील यांचा दुसरा मुलगा विशाल पाटील याने उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 103(1),118(1),115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.