तुळजापूर – तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नावे नोंदविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेश्मा धिरज वैंजणे, आयुषा आनंद शिंदे, वरुण बाळासाहेब गोंडे, आनंदी अशोक जाधवराव, विद्या भगवान सोनटक्के यांच्यासह 35 जणांनी बनावट आधार कार्ड तयार करून ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार अरविंद शंकरराव बोंळगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या कालावधीत तहसील कार्यालयातून बनावट आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणी केली. त्यांनी भारत निवडणूक आयोगाचे ‘व्होटर हेल्पलाइन अॅप’ वापरून ऑनलाइन पद्धतीने बनावट कागदपत्रे सादर केली आणि मतदार यादीत आपली नावे समाविष्ट केली.
या प्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 318(2),61(2), 335, 336(2), 336(3), 340(2),3(5), 172, 62 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून भारत निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.