धाराशिव शहर, ज्याचे पूर्वीचे नाव उस्मानाबाद होते,काही दिवसापूर्वी नाव बदलले असले तरी शहरातील समस्यांत फारसा बदल झालेला नाही. या नावाच्या बदलामुळे अपेक्षित होतं की शहरात काही सकारात्मक बदल घडतील, पण प्रत्यक्षात स्थिती “नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा” अशीच राहिली आहे. समस्या त्या पूर्वीच्याच आहेत, त्यात नव्याने काहीच सुधारणा झालेली नाही.
शहरात ३०० कोटी रुपयांची भुयारी गटार योजना राबवली गेली. या योजनेसाठी शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. मात्र, खोदलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी न झाल्याने रस्त्यांची अवस्था बिकट आहे. योजना कागदावर आणि निवेदनांमध्ये असली, तरी प्रत्यक्षात ती केवळ नावापुरती राहिली आहे. दिलेल्या पाईप्सची गुणवत्ता निकृष्ट असल्याचे आरोपही होत आहेत, ज्यात भ्रष्टाचाराचा सुगावा येतो.
धाराशिव नगरपालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक असले तरीही समस्यांचा अंत नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने एसआयटी चौकशी सुरु आहे, मात्र त्याचा परिणाम शहरातील जनजीवनावर फारसा दिसून येत नाही. शहरातील सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी घेतली असली तरी ते आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या दुर्लक्षामुळे एका २२ वर्षीय तरुणाचा जीव गमवावा लागला.
ओंकार जाधवर या तरुणाच्या मृत्यूने या समस्येची भीषणता अधोरेखित केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. यापूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले गेले होते, मात्र अधिकारी वर्गाकडून त्याला गांभीर्याने घेतले गेले नाही. एकजणाचा बळी गेला त्यानंतरच रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. ही केवळ निष्काळजीपणाची बाब नाही तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
धाराशिव शहरातील मुख्य मार्गांवरील खड्ड्यांची अवस्था इतकी वाईट आहे की नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भवानी चौक या मार्गांवरील परिस्थिती विशेषत: गंभीर आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवघेणी कसरत आहे. इतकेच नव्हे तर या मार्गांची डागडुजी करण्यासाठी आदेश दिलेले असतानाही कामाला सुरुवात झाली नव्हती.
हे सर्व घडत असताना, राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, या सगळ्यात सामान्य नागरिकांचे आणि तरुणांचे जीव धोक्यात येत आहेत. कोणतीही राजकीय खेळी या प्राणहानीचे उत्तर देऊ शकत नाही.
याप्रकारावरून हे सिद्ध होते की नाव बदलणे हे केवळ वरवरचे पाऊल आहे. मूलभूत समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील नागरिकांच्या जिवितावर गंभीर परिणाम होत आहेत. प्रशासक असो वा राजकीय नेते, त्यांनी या समस्यांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची केवळ घोषणा न होता, त्वरित कृती आवश्यक आहे. अन्यथा, धाराशिव हे शहर केवळ नावापुरतेच बदलेले राहील आणि नागरिकांना तेच जुने प्रश्न, जुन्या समस्या, आणि अपघातांचे धोकादायक साम्राज्य भोगावे लागेल.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह