धाराशिव: शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय व्यवसायिकाचा मृत्यू झाल्याने शहरात संतापाची लाट पसरली आहे.
ओंकार जयदेव जाधवर (२२, रा. गवळीवाडा) हा सराफा व्यवसायिक तरुण गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून बस स्थानकाकडे जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान अंबिका मशिन्स या दुकानासमोर असलेल्या खड्ड्यात पडला. खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडलेल्या ओंकारच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले. मात्र सोलापूरला जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
धाराशिव: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर दुचाकीस्वार ओंकार जाधवर (वय २२ ) याचा अपघात खड्ड्यामुळे झाला. यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून कडक कारवाईची मागणी केली.
घटनेनंतर शिवसेना नेत्यांनी कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे किती बळी घ्याल, असा तीव्र सवाल उपस्थित केला. या अपघाताला कार्यकारी अभियंता जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या डागडुजीसाठी कार्यारंभ आदेश दिला गेला होता, मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामाला सुरुवात झाली नव्हती.
दरम्यान, शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंत्यांना दुचाकीवर बसवून रस्त्यावरील खड्ड्यांची दुरवस्था दाखवली आणि खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईपर्यंत त्यांना जागेवरून हलू देणार नाही, असा इशारा दिला. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले.
शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी रस्त्याची दुरवस्था कबूल केली, मात्र पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगून, तरुणाच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण, याबाबत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.
शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते भवानी चौक या मार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या दुरुस्तीच्या कामामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी एका बळीची किंमत मोजावी लागल्याची नाराजी जनतेतून व्यक्त होत आहे.
वाचा सविस्तर
खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू : जबाबदार कोण ?