धाराशिव: जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने धाराशिवमधील निंबाळकर विरुद्ध पाटील या पारंपरिक राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा धार आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीतून प्रवास केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दांत हल्लाबोल केला असून, दोघांमधील वैर पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गाडीत एकत्र प्रवास झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. यावर बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील जनतेच्या समस्या आणि दुष्काळाची भीषणता कळावी, यासाठीच मी गाडीत बसलो होतो. बाकी त्यांचं (राणा जगजितसिंह पाटील) मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच नीच आहे,” असा घणाघाती आरोप ओमराजे यांनी केला.
धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील राजकीय आणि कौटुंबिक वैर सर्वश्रुत आहे. दुष्काळ पाहणीच्या दौऱ्यात प्रशासकीय पातळीवर एकत्र येण्याची वेळ आली तरी दोघांमधील कटुता तसूभरही कमी झालेली नाही, हेच ओमराजेंच्या या आक्रमक भूमिकेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ओमराजेंच्या या जहरी टीकेनंतर आता राणा पाटील गट काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






