तुळजापूर: दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर निघालेल्या मंत्र्यांचा ताफा अचानक एका अनधिकृत हॉटेलसमोर थांबतो आणि थेट राज्याचे परिवहन मंत्रीच लालपरीच्या दारात जाऊन उभे ठाकतात… हा कुठला सिनेमाचा सीन नाही, तर तुळजापूर मार्गावर घडलेला थेट ‘रिअल’ ड्रामा आहे. एसटी महामंडळाचे अधिकृत उपहारगृह सोडून प्रवाशांना खाजगी हॉटेलवर नेऊन लुटणाऱ्या चालक आणि वाहकाला राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जागेवरच चांगलाच घाम फोडला.
बुधवारी (२३ सप्टेंबर) धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक तुळजापूर मार्गे जात होते. प्रवासात असताना रस्त्याकडेला एक एसटी बस महामंडळाच्या अधिकृत थांब्याऐवजी एका वेगळ्याच खाजगी हॉटेलवर उभी असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. बस्स, मंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी थांबवली आणि थेट एसटीकडे धाव घेतली.
लालपरीच्या अधिकृत कॅन्टीनला बगल देऊन कमिशनच्या लालसेपोटी किंवा संगनमताने प्रवाशांना महागड्या खाजगी ढाब्यांवर वेठीस धरणाऱ्या चालक आणि वाहकाची मंत्र्यांनी चांगलीच शाळा घेतली. “प्रवाशांना नाहक त्रास देऊन त्यांची लूट चालू आहे का?” असा जाब विचारत सरनाईकांनी दोघांनाही सज्जड दम भरला.
“प्रवाशांची लूट अजिबात खपवून घेणार नाही!”
या अचानक झालेल्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. “कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना त्रास होईल किंवा त्यांची लूट होईल असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत,” अशी सक्त ताकीद त्यांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे.
परिवहन मंत्र्यांच्या या ‘अचानक’ धाडीमुळे तुळजापूर मार्गावरील खाजगी हॉटेलचालकांचे आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे धाबे पुरते दणाणले आहेत. प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणाऱ्यांविरोधात पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या ‘ॲक्शन मोड’ची सध्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.




