धाराशिव: धाराशिव जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यावर विविध प्रशासकीय त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव दिला आहे.
डव्हळे यांनी वैद्यकीय रजेसाठी अर्ज केला होता, परंतु त्यांच्यावर पुरेसे पुरावे नसल्यामुळे आणि रजेच्या काळात कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे डॉ. ओम्बासे यांनी रजा मंजूर न करता त्यांना मेडिकल बोर्डाकडे तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
याव्यतिरिक्त, डव्हळे यांनी शासकीय आचरणातील कसूरी आणि आज्ञापालनात कमतरता दर्शविल्याने जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना कारवाईसाठी शिफारस केलेली फाईल पाठविली आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली आहे. राहुल सलगर, रवी भांडे, अंगद माने आणि प्रमोद चंदनशिवे हे या समितीचे सदस्य आहेत. या समितीला डव्हळे यांच्या कामातील त्रुटींचा तपास करून निश्चित मुदतीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डव्हळे यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.