पुणे : छेडछाडीला कंटाळून धाराशिव जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने पुण्यात आत्महत्या केली असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सदर विद्यार्थिनी लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रहिवासी असून, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती.
दक्षिण पुण्यामधील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि त्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहात (हॉस्टेल) राहणाऱ्या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या हॉस्टेलमध्ये काम करणारा तरुण तिला त्रास देत होता. तसेच, तिच्या खोलीत राहणारी विद्यार्थिनी तिला विविध प्रकारे त्रास देत होती. त्यामुळे पिडीत विद्यार्थिनीने ७ मार्च रोजी स्वत:ला पेटवून घेतले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिची झुंज अपयशी ठरली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुका बालाजी साळुंके (वय १९, रा. इंजिनियरींग कॉलेज हॉस्टल, भारती विद्यापीठ) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याच हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव (रा. इंजिनियरींग हॉस्टेल कॅंटीन) आणि मुस्कान महेंद्रसिंग सिद्ध (वय १९, रा. इंजिनियरींग कॉलेज हॉस्टेल, भारती विद्यापीठ) यांच्यावर भादवि ३५४, ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बालाजी धोंडीबा साळुंखे (वय ४९, रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशीव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका भारती विद्यापीठ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. ती याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतीगृहात राहत होती.
तर, आरोपी सतीश जाधव हा या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करतो. तो तिला सतत ‘आय लव यू’ असे मेसेज करीत होता. तसेच ‘तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले?’ अशी येता जाता विचारणा करायचा. या प्रकारांमुळे ती घाबरलेली होती. यासोबतच तिच्या खोलीमध्ये राहणारी मुस्कान सिद्धू ही तिला सतत त्रास द्यायची. तिच्या अभ्यासात व्यत्यय आणायची. ती अभ्यासाला बसली की खोलीमधील दिवे बंद करायची. या दोघांकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे रेणुका नैराश्यात गेली होती. या त्रासाला कंटाळून तिने ७ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास होस्टेलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतले. गंभीररित्या भाजलेल्या रेणुकाला तात्काळ सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे करीत आहेत.