धाराशिव : सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांची सोमवारी वेळेवर हजेरी कधी लागेल, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. नियमित वेळेवर येण्याचा प्रश्न बाजूलाच, पण आले तरी ते कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील विश्रांतीगृहात जाऊन बसतात. तिथे आराम करणाऱ्या अधिकाऱ्यांची जनतेच्या कामांकडे मात्र तितकीशी पडताळणी नसते.
काही वेळाने कामासाठी शिपाई गेल्यास, अधिकारी थकवा असल्याचे सांगून दुपारनंतर पाहतो, असे उत्तर देतात. परिणामी, जनतेची महत्त्वाची कामे खोळंबतात. त्यातच कार्यालयातील बारा वर्षांपासून बंद असलेले विद्युत पंखे अजूनही दुरुस्त झालेले नाहीत. कामासाठी आलेल्या नागरिकांना उन्हाच्या झळा सोसत तासनतास थांबावे लागते.
याशिवाय, काही एजंटांकडून अधिक पैसे घेऊन त्यांची कामे झटपट केली जात असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक मात्र या अधिकाऱ्यांच्या वेळा आणि नियमांच्या गोंधळात सापडत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.