धाराशिव – तालुक्यातील मोजे समुद्रवाणी येथील ग्रामसेविका ए. एस. शिंदे यांच्या विरोधात लोकनियुक्त सरपंच मीरा संतोष हनुमंते यांनी 8 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन केले. ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून शिंदे यांना सेवा बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सरपंच मागासवर्गीय समाजातील असल्याने ग्रामसेवक जाणीवपूर्वक अपमानजनक वागणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, गाव पुढार्यांच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून सरपंचांवर दबाव आणला जात असल्याचा दावाही करण्यात आला.
ग्रामपंचायतीची 6 ऑगस्ट रोजी झालेली सभा सरपंचांच्या परवानगीशिवाय घेण्यात आली आणि त्यात बेकायदेशीर ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. याशिवाय, मालमत्ता क्रमांक 345 ची मोजणीही सरपंचांच्या परवानगीशिवाय करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. जातीय हेतूने अतिक्रमण नसतानाही अतिक्रमण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच मीरा संतोष हनुमंते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरपंचांचे म्हणणे
ग्रामसेविका शिंदे या गाव पुढार्यांच्या आधारे सरपंचांना पायउतार करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरपंचांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांचे घर उध्वस्त करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
यापूर्वीही ग्रामसेविकांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सरपंचांनी सांगितले.