पत्रकारितेत ऊन-पावसाचे चटके खात तब्बल ३५ वर्षे लोटली. ‘लोकमत’, ‘एकमत’, ‘लोकसत्ता’, ‘गावकरी’ अशा दिग्गज आणि नामवंत दैनिकांच्या मुशीत तावून-सुलाखून निघाल्यानंतर, जेव्हा डिजिटल मीडियाचे नुसते वारे वाहू लागले होते, तेव्हा १४ वर्षांपूर्वी मी ‘धाराशिव लाईव्ह’ची ठिणगी टाकली.
धाराशिवसारख्या मागास जिल्ह्यात, जिथे २G च्या स्पीडवर इंटरनेट रांगायचं आणि बातम्या फक्त कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर वाचल्या जायच्या, तिथे हा ‘डिजिटल’ प्रयोग अनेकांना चेष्टेचा विषय वाटला. त्यावेळी माझ्यावर हसणारे आज काळाच्या ओघात कुठे फेकले गेले, हे त्यांनाही समजले नाही. जे हसले, ते फसले आणि मागे पडले! जग बदलले, स्मार्टफोन आले, ५G आले आणि ‘डिजिटल मीडियात’ क्रांती झाली. ‘धाराशिव लाईव्ह’ने काळाच्या पुढचे पाऊल टाकत जिल्ह्याच्या माथ्यावर ‘नंबर १ डिजिटल चॅनल’चा मुकुट चढवला.
आमची ओळख: एक निर्भीड आणि सडेतोड व्यासपीठ
‘धाराशिव लाईव्ह’ची ओळख काय? तर एक निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड चॅनल! बातमी देताना आम्ही कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही, कुणाची आरती ओवाळत नाही. सत्य हेच आमचे भांडवल.
याच बाणेदार पत्रकारितेतून आम्ही तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तुळजापूर बस स्थानक प्रकरण आणि पोकळ घोषणांचा असा काही पर्दाफाश केला, की अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली.
सत्य पचनी न पडल्याने चवताळलेला ‘नेता’
आमच्या या सडेतोड पत्रकारितेमुळे तुळजापूरचा एक सत्ताधारी नेता चांगलाच चवताळला आहे. स्वतःला ‘मोठा नेता’ समजणाऱ्या या महाशयांची तुळजापूर आणि धाराशिव तालुका सोडला, तर बाहेर कवडीचीही किंमत नाही. पण सत्तेच्या मस्तीत वावरणाऱ्या या नेत्याचा खरा चेहरा ‘धाराशिव लाईव्ह’ने वेशीवर टांगला.
सत्य पचनी न पडल्याने या महाशयांनी आधी भाडोत्री यंत्रणेकडून माझी सोशल मीडियावर बदनामी मोहीम चालवली. तेवढ्याने समाधान न झाल्याने ५०० जणांचा जमाव गोळा करून पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि म्हणे, “सुनील ढेपेच्या संपत्तीची चौकशी करा!”
त्यांच्या या पोरकटपणावर मी त्यांना उघड्यावर एकच थेट आव्हान दिले:
“माझी सगळी संपत्ती या नेत्याच्या नावावर करा आणि त्याची सगळी संपत्ती माझ्या नावावर करा. त्याची आलेली सगळी संपत्ती मी गोरगरीब जनतेला वाटून टाकीन!”
या एका आव्हानाने त्यांची बोलतीच बंद झाली.
गुंडांचा आधार आणि पोलिसांचा गैरवापर
स्वतः मैदानात यायची हिंमत नसल्याने या नेत्याने आपले तीन ‘चमचे’ पुढे केले आणि पत्रकार परिषद घेऊन “आम्ही पत्रकारांच्या विरोधात नाही, फक्त सुनील ढेपेंच्या विरोधात आहोत,” असा केविलवाणा बचाव केला.
माझा गुन्हा काय? मी जनतेसमोर सत्य छापतो, हा माझा गुन्हा?
सत्तेचा आणि पैशाचा माज इतका की, ज्याच्यावर १८ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा तुळजापूरच्या एका तथाकथित गुंडाला हाताशी धरून माझ्यावर एक-दोन नव्हे, तर चक्क तीन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यासाठी पोलिसांच्या बळाचाही पुरेपूर वापर करण्यात आला.
प्रवृत्तीविरुद्धचा लढा सुरूच राहील!
पण या सत्तेच्या ठेकेदारांना एकच ठणकावून सांगणे आहे-
तुम्ही कितीही बदनामी करा, कितीही खोटे गुन्हे दाखल करा, तुम्हाला जो पोलीस बळाचा वापर करायचा आहे तो करा… पण सत्य छापायला ही लेखणी कचरत नाही! तुमचा खरा, भ्रष्ट ढोंगी, मुखवटा पांघरलेला आणि बुरसटलेला चेहरा जनतेला दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.
लक्षात ठेवा, माझी लढाई कुणा एका व्यक्तीविरुद्ध नाही, तर सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीविरुद्ध आहे. आणि ही लढाई सत्याचा विजय होईपर्यंत अशीच धगधगत राहील!
– सुनील ढेपे (संपादक, धाराशिव लाईव्ह)







