धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, धाराशिव शहर, भूम आणि उमरगा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या तिन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धाराशिव शहरातील रामवाडी येथील तुषार दगडू कोळी (वय ३७) यांची सुमारे ३० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो (एमएच-२५-एक्स-८९००) ही मोटारसायकल २९ जुलै रोजी सायंकाळी डॉक्टर जिंतुरकर यांच्या घरासमोर, संजीवनी हॉस्पिटलच्या पाठीमागील परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी १ ऑगस्ट रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भूम शहरातील कसबा येथील अशोक दत्तात्रय साबळे (वय ४३) यांची ३० हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-२५-एएक्स-१४४८) ही मोटारसायकल ३० जुलै रोजी आठवडी बाजार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या कमानीजवळून चोरीला गेली. याबाबत भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत, कर्नाटकातील आळंद तालुक्यातील पडसावळी येथील काशिनाथ महादेव कुंभार (वय ३१) यांची केए-ईएस-५१८५ क्रमांकाची सुमारे ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल २८ जुलै रोजी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील धनगरवस्ती परिसरातून चोरीला गेली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिन्ही घटनांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

