तुळजापूर : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी एका माजी नगराध्यक्षास ताब्यात घेतले असल्याची चर्चा शहरात पसरली आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे हा तपास कोणत्या दिशेने जात आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
मुंबईची मावशी संगीता गोळे अटकेत; तपासाला वेग
या ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील कुख्यात “मावशी” संगीता गोळे हिला अटक केल्यानंतर तपासाला अधिक गती मिळाली आहे. तामलवाडी पोलिसांनी याप्रकरणी आणखी काही मोठ्या मास्यांना गळाला लावण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, संगीता गोळे हिला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आतापर्यंत चार आरोपी अटकेत:
- संगीता गोळे (मुंबई) – ३ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी
- अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (रा. तुळजापूर)
- युवराज देविदास दळवी (रा. तुळजापूर)
- संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग)
पोलिसांच्या हाती लागलेला मुद्देमाल:
- 45 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज – अंदाजे किंमत ₹2,15,000
- गुन्ह्यात वापरलेली मोटार कार (MH 25 R 5598) – ₹7,50,000
- चार स्मार्टफोन – ₹1,72,000
गेल्या काही वर्षापासून मुंबईहून एमडी ड्रग्ज तुळजापुरात आणून ते एक ग्रॅम ३ हजार रुपयास विकले जात होते त्यात जवळपास दीड हजार तरुण जाळ्यात अडकले होते. याप्रकरणी श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी आणि काही जागरूक नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर आता कुठे कारवाई सुरु झाली आहे.
बडे मासे कधी गळाला लागणार?
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिलेला ७२ तासांचा अल्टिमेटम संपून चार दिवस झाले आहेत. तुळजापूर पोलिसांनी अद्याप ठोस कारवाई केली नसल्याने शहरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र, तामलवाडी पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे, त्यामुळे प्रकरण नव्या वळणावर गेले आहे.
राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर संशय
तुळजापूरमध्ये काही प्रमुख ड्रग्ज पेडलर सक्रिय असल्याचे बोलले जाते. हे पेडलर एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या गटाशी संलग्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या नेत्याच्या वाढदिवसाला हे ड्रग्ज पेडलर पत्रकार परिषदांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये झळकत असतात.
तुळजापूर आणि तामलवाडी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून, मोठे मासे गळाला लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.