महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत सध्या जे काही चालले आहे, ते पाहून देवीच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक भक्ताचे रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही. भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या तुळजापूरचे रूपांतर आता ‘जुगार, दारू आणि देहविक्री’च्या अड्ड्यात झाले आहे का? हा प्रश्न आता कुण्या पत्रकाराने नव्हे, तर खुद्द भाजपच्याच नगरसेविकेने उपस्थित केल्याने सत्तेच्या आणि खाकीच्या गुर्मीत वावरणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
खाकी वर्दी की हप्तेखोरांचे कवच?
तुळजापूर शहरात डीवायएसपी निलेश देशमुख आणि पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या आगमनानंतर कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्याऐवजी गुंडांचे आणि अवैध धंदेवाल्यांचे राज्य आले आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहराच्या पवित्रतेला काळिमा फासणारे वेश्या व्यवसायाचे अड्डे, जुगार आणि ड्रग्जचे रॅकेट खुलेआम सुरू आहेत. हे सर्व पोलिसांच्या नाकाखाली घडतेय, की पोलिसांच्याच ‘आशीर्वादाने’ घडतेय? गोपाळ नगर आणि बस स्टँड परिसरातून जाणाऱ्या माता-भगिनींकडे पाहून अश्लील हावभाव केले जातात, कॉलेजच्या मुलींना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. तरीही पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी आणि खिशात ‘अर्थ’पूर्ण वजन ठेवून गप्प का? डीवायएसपी देशमुख आणि पीआय मांजरे, तुम्हाला जनतेच्या रक्षणासाठी नेमले आहे की अवैध धंद्यांच्या संरक्षणासाठी?
भाजपचा दुतोंडीपणा आणि सोयीचा ‘साक्षात्कार’
या प्रकरणातील सर्वात संतापजनक भाग म्हणजे स्थानिक राजकारण्यांचा, विशेषतः भाजपचा किळसवाणा दुतोंडीपणा. जेव्हा ‘धाराशिव लाइव्ह’ आणि संपादक सुनील ढेपे यांनी हेच सत्य मांडले, अवैध धंद्यांवर प्रहार केला, तेव्हा भाजप आमदार राणा पाटील आणि त्यांच्या कंपूचा तीळपापड झाला होता. तेव्हा हे सत्य त्यांना ‘तुळजापूरची बदनामी’ वाटली. एका गुंडाला हाताशी धरून, ज्याच्यावर १८ गंभीर गुन्हे आहेत, पत्रकारावर खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या. सोशल मीडियावर ट्रोलिंगची राळ उडवून दिली.
पण आज काय झाले? आज भाजप नगराध्यक्ष पिटू गंगणे यांचीच भावजय आणि भाजप नगरसेविका प्रियांका गंगणे यांना अचानक शहरात वेश्या व्यवसाय आणि अवैध धंदे दिसत आहेत. विशेष म्हणजे, ज्या विजय गंगणे यांनी काही दिवसांपूर्वी “पत्रकार बदनामी करत आहेत” म्हणून कांगावा केला होता, तेच आता पत्नीच्या तक्रारीसोबत उभे आहेत. निवडणुकीपूर्वी हे सत्य ‘बदनामी’ होते आणि निवडणूक संपताच तो ‘अन्याय’ झाला? हा साक्षात्कार आहे की सोयीचे राजकारण?
आता उत्तर द्या!
पत्रकाराने सत्य मांडले की त्यांचा आवाज दाबायचा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि जेव्हा आपल्याच घरातून, आपल्याच पक्षातून आवाज उठतो तेव्हा सोयीस्कर भूमिका घ्यायची, हा भाजपचा दुतोंडी चेहरा तुळजापूरकरांनी ओळखला आहे.
आमदार राणा पाटील, आता तुम्ही गप्प का? तुमच्या पक्षाच्या नगरसेविकेनेच पोलीस प्रशासनाचे आणि अवैध धंद्यांचे वाभाडे काढले आहेत. आता तुम्ही कोणावर गुन्हे दाखल करणार? की आता मान्य करणार की तुळजापूरची बदनामी पत्रकारांनी नाही, तर तुमच्या संरक्षणात फोफावलेल्या अवैध धंदेवाल्यांनी आणि कर्तव्यशून्य पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे?
तुळजापूरच्या पवित्र भूमीवर चाललेला हा ‘पापा’चा नंगानाच तात्काळ थांबला पाहिजे. नगरसेविका प्रियांका गंगणे यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा हा केवळ एका पक्षाचा नसून, तो तुळजापूरच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आवाज आहे. जर पोलिसांनी आताही कुंभकर्णी झोप सोडली नाही आणि हे अवैध धंदे मुळासकट उखडून टाकले नाहीत, तर जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळी होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणारे राजकारणीच जबाबदार असतील.
-सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह





