तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील केवडकर नगर येथे राहणारे दत्तात्रय रत्तु चव्हाण (वय 43) यांनी 10 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचे बंधू सुभाष रत्तु चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी दत्तात्रय यांच्यावर वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली होती. लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या पोटगी व घटस्फोट प्रकरणात सतत तारखा आल्याने आणि पत्नी जयश्री चव्हाण हिच्या नावे घराची जागा करून दिल्यामुळे दत्तात्रय मानसिकदृष्ट्या खचले होते.
आरोपींमध्ये दत्तात्रय चव्हाण यांची पत्नी जयश्री चव्हाण (रा. पापनाश नगर, तुळजापूर), विमलबाई मोहन राठोड, मोहन राठोड (रा. गुभाळ, लातूर), रामा चंदु पवार (रा. मोतीझरा लमाण तांडा, तुळजापूर) आणि सुधाकर हरीबा राठोड (रा. केवडकर नगर, तुळजापूर) यांचा समावेश आहे.
सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम- 108, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणात संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.