तुळजापूर | स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तुळजापुरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्स पकडण्यात आले आहेत. पोलिसांनी 2.50 लाख रुपये किंमतीच्या अमली पदार्थासह गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल मिळून एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी अमली पदार्थ विक्रीप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तुळजापूर उपविभागात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
टोल नाक्यावर संशयास्पद कार पकडली
सोलापूर-तुळजापूर महामार्गावर तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे एक मोटार कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांना आढळले. कारमध्ये तीन इसम आढळले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी मुंबईहून एमडी ड्रग्स विक्रीसाठी तुळजापुरात आणल्याची कबुली दिली. तत्काळ पंचनामा करून 59 पुड्या एमडी ड्रग्स (किंमत 2,50,000 रुपये), गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल असा एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (रा. तुळजापूर)
- युवराज देविदास दळवी (रा. तुळजापूर)
- संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग)
तिघांनाही पोलीस ठाणे तामलवाडी येथे हजर करून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकूर, पोउपनि लोंढे यांच्यासह पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, माने, सलगर, सुरनर, चौगुले आणि चालक शेख यांनी सहभाग घेतला.