तुळजापूर – नवरात्र उत्सवात भक्तिरसात डुंबणाऱ्या तुळजापूर नगरीला चोरांनी मात्र आपल्या कारवायांनी धुंद केलं आहे! महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव धुमधडाक्यात सुरु असताना, भक्तांचे हात जोडलेले असले तरी चोरांचे हात मात्र सोन्याच्या दागिन्यांवर वळलेले दिसत आहेत. महिला भाविक बनून आलेल्या ‘विशेष’ चोरांनी भाविकांच्या गळ्यातील दागिने हुशारीने गायब करण्याचा खेळ रंगवला आहे.
पोलीस मात्र या सगळ्यावर “दुहेरी” नजर ठेवून आहेत. एका डोळ्याने चोरांवर लक्ष ठेवलेले असताना, दुसऱ्या डोळ्याने काही जुगारपटूंकडे झुकलेले दिसत आहे. तुळजापूरच्या बसस्थानक परिसरात ‘टायगर गेम’ नावाच्या जुगाराचा खेळ दुप्पट पैसे देण्याच्या आमिषात भाविकांना फसवत असल्याचं समोर आलं आहे. काही चोर आणि जुगारपटू एकत्र येऊन भाविकांचा उत्सव चांगलाच लुटत आहेत.
आता यात पोलिसांची गोष्ट अजून मजेदार आहे! सात गुन्हे दाखल झाले आहेत, पण पोलिसांचं लक्ष जुगाराच्या कागदांवर एवढं केंद्रित झालंय की त्यांची स्वतःची “कमाई” जोरात सुरु आहे. आरोपींच्या खिशातून सॅमसंग, विवो, आणि आयफोनचे महागडे मोबाईल हँडसेट्स आणि ठराविक रक्कम सापडली आहे. ह्या सर्व ‘खेळाडू’ मंडळींना रोख रकमेसोबतच मोबाइलचे “शौक”ही आहे, असं दिसतंय!
तर, भाविक हो, भक्तीचा उत्सव आहे, पण तुमच्या सोन्याच्या चेनवर लक्ष ठेवा आणि ‘टायगर गेम’ च्या टाळक्या पासून सावध राहा. एकीकडे देवीचं दर्शन, तर दुसरीकडे पोलिस आणि चोरांच्या कारवायांची कसरत – हेच आहे तुळजापूरचं नवरात्र महोत्सवाचं ‘रिअल टाइम एंटरटेनमेंट’!