धाराशिव – उमरगा तालुक्यातील निलूनगर तांड्यावर राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनी कोरियन सिंगर आणि डान्स ग्रुप BTS-V च्या प्रेमापोटी दक्षिण कोरियाला जाण्याचा कट आखला. यासाठी त्यांनी घरातून चोरी करत पळ काढला आणि अपहरणाची बनावट कथा तयार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या 30 मिनिटांत मुलींचा शोध लावून त्यांना घरी परत आणले.
निलूनगर तांड्यावर राहणाऱ्या या तिन्ही मुलींची वयं केवळ 11 आणि 13 वर्षे आहेत. मोबाईलच्या माध्यमातून त्या कोरियन गायक आणि डान्स ग्रुपच्या संपर्कात आल्या होत्या. कोरियाला जाण्याची स्वप्ने पाहत त्यांनी घरातील पैसे आणि मौल्यवान वस्तूंची चोरी केली. पळून जाताना त्यांनी घरच्यांना फोन करून स्वतःचे अपहरण झाल्याची खोटी माहिती दिली.
पोलिसांनी हा खोटा प्लॅन उघडकीस आणत मुलींना सुरक्षितपणे घरी पोहोचवले. मुलींच्या वर्तनामागील मूळ कारणे शोधण्याचे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे आवाहन आता पालक आणि शिक्षकांकडून केले जात आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर आणि इंटरनेटवरील नकारात्मक प्रभाव यामुळे अशा घटना घडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
उमरगा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पालकांनी मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पोलिसांनी आवर्जून सांगितले.
संपूर्ण व्हिडीओ पाहा