धाराशिव : राज्य सरकार कॉपीमुक्त अभियानाच्या घोषणा करत असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी या अभियानाला आपली वेगळीच छटा दिली आहे. त्यांनी थेट 12 वीच्या परीक्षा केंद्रात प्रवेश करून ‘परीक्षा निरीक्षण’ नावाखाली ‘फोटो सेशन’चा सपाटा लावला. विद्यार्थी पेपर सोडवीत असताना आमदार साहेबांना फोटो काढण्याचा मोह अनावर झाला आणि सोशल मीडियावर पोस्टही केल्या!
विद्यार्थ्यांचा अभ्यास की आमदारांचा प्रकाशझोत? पेपर सुरू असताना अचानक परीक्षा हॉलमध्ये आमदार साहेबांचा ताफा शिरला आणि फोटो क्लिक करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे अडथळा निर्माण झाला की नाही, हा मोठा प्रश्न आहे. मात्र, यामुळे ‘कॉपी मुक्त’ मोहिमेपेक्षा ‘फोटो मुक्त’ मोहीम गरजेची आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मोबाईल बंदी शिक्षक आमदारांसाठी नाही? राज्य सरकारच्या नियमानुसार परीक्षा केंद्रात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद असतात. मात्र, विक्रम काळे साहेबांना हे नियम लागू नसावेत, असे दिसते. कारण त्यांनी केंद्रात जाऊन मनसोक्त फोटोशूट केले. मग विद्यार्थ्यांसाठी कडक नियम आणि आमदारांसाठी मोकळीक का? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
परीक्षा पाहणी की प्रमोशन? शिक्षक आमदार असल्याने विक्रम काळे यांना परीक्षा केंद्रावर पाहणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, फोटो काढण्याचे परवानगीपत्र त्यांना कोणी दिले? याबाबत परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत. ‘ते पाहणी करू शकतात, पण फोटो काढण्याबाबत नियम स्पष्ट नाहीत,’ असे त्यांनी सांगितले.
एक परीक्षा, अनेक फोटोशूट! विक्रम काळे यांनी केवळ एका ठिकाणीच नव्हे, तर धाराशिवच्या येडशी, सोलापूरच्या बार्शी, बीडच्या धारूर, परभणीच्या पाथरी अशा अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या आणि फोटोशूटही केले. त्यामुळे ‘परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा आमदार साहेबांचे फोटो जास्त व्हायरल झाले,’ अशी मिश्किल टीका नेटिझन्स करत आहेत.
तर, सरकार परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असताना, आमदारांनी परीक्षा ‘ग्लॅमरयुक्त’ करण्याचा संकल्प केला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे