धाराशिव: शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे २४ वर्षीय युवक ओंकार जाधवर यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संतापाची लाट पसरली असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ओंकार जाधवर हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिजाऊ चौकाकडे दुचाकीने जात असताना त्यांचा अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी घसरली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक संघटना, पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ओंकार जाधवर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दर दोन वर्षांनी लाखो रुपये खर्च केले जातात. याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.