नुकतीच विधान परिषदेची धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली. भाजपचे बसवराज पाटील मुरूमकर साहेब विक्रमी मतांनी निवडून आले. पण राजकारणात जिंकण्यापेक्षा त्या विजयाचं ‘क्रेडिट’ कोणी घ्यायचं, यावरूनच खरी मारामारी असते! सध्या एक दुसरे पाटील साहेब या विजयाचे ढोल स्वतःच्या गळ्यात बांधून बडवत आहेत. पण आतली बातमी अशी आहे की, या पाटलांनी विजयात मदत कमी आणि ‘त्रास’ जास्त दिलाय, हे खुद्द बसवराज साहेबच उघड्यावर (किंवा फडणवीसांच्या कानात) सांगू शकतील!
चुलत भावांची ‘महाभारत’ वेबसिरीज
धाराशिवच्या राजकारणात सध्या एका भारी वेबसिरीजचं मटेरियल तयार आहे. एक पाटील आणि एक निंबाळकर. दोघे चुलत भाऊ, पण त्यांच्यात ‘आडवा विस्तव’ सोडा, साधं व्हॉट्सॲपचं स्टेटसही मॅच होत नसावं! एक आमदार तर दुसरा खासदार.
या आमदार पाटलांचा इतिहासही रंजक आहे. २०१९ पूर्वी ‘घड्याळ’ हाती होतं, तिथे साहेबांचा ‘वन मॅन शो’ होता. पण लोकसभेत दणका बसल्यावर त्यांनी थेट ‘कमळ’ हाती घेतलं. आता गेल्या सहा वर्षांपासून भाजपमध्येही ‘आपलाच एकखांबी तंबू’ असावा, पक्षाला आपणच चालवावं म्हणून त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. पण राजकारण काय घरची शेती थोडीच आहे? त्यांचा हाच ओव्हर-स्मार्टनेस आता बुमरँगसारखा त्यांच्यावरच उलटला आहे.
तिकीट फक्त ‘येस बॉस’ म्हणणाऱ्यांना!
जिल्हा परिषद, पंचायत समिती असो वा नगरपालिका, पाटलांनी तिकीट वाटपात फक्त आपल्या ‘जी हुजूर’ समर्थकांनाच जवळ केलं. रामदास कोळगेंसारख्या जुन्या निष्ठावंतांना ‘थांबा, तुमची वेळ येईल’ म्हणून थेट वेटिंग लिस्टवर टाकले. वरून झेडपीमध्ये स्वबळावर सत्ता नसताना शिंदे गटाची मदत घेतली आणि पक्षश्रेष्ठींनाही अंधारात ठेवून थेट स्वतःच्या पत्नीलाच अध्यक्षपदी बसवून टाकले! साहजिकच, पक्षातल्या अनेकांच्या पोटात यावरून कधीचाच गोळा आला होता.
पैशांची मागणी आणि ‘निष्काम कर्मयोग’
आता येऊया विधान परिषदेच्या मुख्य ट्विस्टकडे. निवडणुकीत बसवराज पाटील मुरूमकर यांना कोणत्या ‘माननीय’ सदस्यांनी पैशांची मागणी केली? “ज्यांना मतदान द्यायचंय त्यांनी द्या, नसेल द्यायचं तर नका देऊ,” असा ‘निष्काम कर्मयोग’ कोणाच्या तोंडून बाहेर पडला? याचं सगळं रेकॉर्डिंग आणि ‘कच्चा चिठ्ठा’ बसवराज पाटलांकडे आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचलाय. त्यामुळे आता कधीही ‘ऑपरेशन क्लीन’ होऊ शकतं.
जशास तसं: ‘तू मला ब्लॉक कर, मी तुला ब्लॉक करतो!’
मागील सोमवारी ‘आपला जीव धाराशिव’ हा कार्यक्रम झाला. त्यात बसवराज पाटलांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आलं. प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळेंचाही अपमान झाला. या सगळ्यामुळे निष्ठावंतांचा पारा असा काही चढला की त्यांनी थेट ‘टिट फॉर टॅट’चा निर्णय घेतला.
आज निष्ठावंतांनी मिळून बसवराज पाटलांचा जंगी सत्कार ठेवला आणि तिथे राणा पाटलांना थेट ‘नो एन्ट्री’चा बोर्ड लावला. या कार्यक्रमात ॲड. व्यंकट गुंड यांनी तर माईकवरून थेट फ्रंटफूटवर येऊन बॅटिंगच केली! ते म्हणाले:
“राणा पाटील यांना निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची ॲलर्जी आहे. ते आम्हाला टाळतात, म्हणून आम्हीही त्यांना टाळतो.”
क्लायमॅक्स: आता दोनच प्रश्नांची चर्चा…
एकूणच काय, धाराशिव भाजपमध्ये सध्या भडका उडाला असून अंतर्गत संघर्ष पेटला आहे. कमळातल्या या कुस्तीत कोण कोणाला अस्मान दाखवतंय, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
सध्या जिल्ह्याच्या कट्ट्यावर दोनच प्रश्न गाजत आहेत:
-
प्रश्न १: बसवराज पाटलांकडे ‘पाकीट’ मागणारे ते भाजपचे महाभाग कोण?
-
प्रश्न २: “मतदान करा किंवा नका करू” असा ‘सल्ला’ देणारे ते संतपुरुष नक्की कोण?
(या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भाजपच्या पुढच्या ‘एपिसोड’ची वाट पाहा!)



