धाराशिव – धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
वरवंटी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी अश्विनी दिलीप मस्के यांचा मुलगा यश दिलीप मस्के (वय १४ वर्षे, ४ महिने) हा १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाला. नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून आला नाही. अज्ञात व्यक्तीने कोणत्याही कारणास्तव त्याला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद
याप्रकरणी फिर्यादी अश्विनी मस्के (वय ३३ वर्षे) यांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.




