नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील उपळी बुरुजावरून गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अश्विनी मोहिते या महिलेने आपल्या तीन मुलांसह उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आता अश्विनी मोहिते, त्यांचा मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी मुलगी गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अश्विनी मोहिते (रा. व्हंताळ, ता. उमरगा; सासर अंबुलगा, ता. निलंगा) असे मयत महिलेचे नाव आहे. अश्विनी मोहिते या कुस्तीपटू असून शालेय जीवनापासूनच कुस्ती स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करत होत्या. तसेच त्या महाराष्ट्र सुरक्षा दलात मुंबईत मेट्रो मध्ये कार्यरत होती, राजीनामा देऊन गावी राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी मोहिते यांनी किल्ल्याच्या उपळी बुरुजावरून प्रथम आपल्या एका मुलाला खाली ढकलले आणि त्यानंतर स्वतः उडी घेतली. त्यांच्यासोबत दोन मुलींनीही उडी घेतली.
घटनेनंतर जखमी मुलींना तातडीने धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अडीच वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे व्हंताळ, अंबुलगा आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नळदुर्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.



