तुळजापूर : दुष्काळ आणि नापिकीच्या संकटामुळे सिंदफळ येथील शेतकरी गुणवंत गणपत क्षीरसागर यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी क्षीरसागर कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या वतीने आज सिंदफळ येथे सहकाऱ्यांमार्फत मदतीचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी सावंत यांनी दुःख व्यक्त करत, संकटाच्या काळात क्षीरसागर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय न घेण्याचे कळकळीचे आवाहन केले.
“निसर्गाच्या लहरीपणाने आणि दुष्काळाच्या संकटाने परिस्थिती कठीण झाली असली, तरी या संकटाशी आपण सर्वांनी मिळून धैर्याने लढले पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्येचा निर्णय घेऊन आपल्या कुटुंबाला पोरके करू नये. मदतीसाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे,” असे आवाहन सावंत यांनी केले.
“अर्ध्या रात्री जरी कसलीही मदत लागली, तरी तुमचा हा भाऊ तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूम सभापती प्रवीण देशमुख, माजी युवासेना जिल्हा प्रमुख डॉ. चेतन बोराडे, तुळजापूरचे युवा नेते ओम जगदाळे, दिगंबर गव्हाणे, शंभू मनगिरे, राहुल शिंदे, याकूब इनामदार, मनोज क्षीरसागर यांच्यासह स्थानिक गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते.






