धाराशिव – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेल्या अनपेक्षित यशाने काँग्रेस कार्यकर्त्यांचा कोमातून जागा झालेला ‘पुनर्जन्म’ पाहण्यासारखा होता. टॉनिक पिऊन तरतरीत झालेल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचं सरकार येणार असल्याचा फाजील आत्मविश्वास चढला आहे. पण हा आत्मविश्वास म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आहे, कारण पक्षातल्या गटबाजीत चक्क मॅरेथॉन सुरू झाल्या आहेत.
धाराशिवमध्ये गटबाजीची मेजवानी तर धडाकेबाज सुरू आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांच्यातील चढाओढ आता पॉपकॉर्न हातात घेऊन बघण्याजोगी झाली आहे. चव्हाण साहेबांचे लाडके सुपुत्र सुनील चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘टाटा-बाय-बाय’ करत भाजपची गाडी पकडली होती. त्यांच्यासोबत काही विश्वासू पंटरही घेऊन गेले. आता आश्चर्य म्हणजे हेच पंटर आता पुन्हा काँग्रेसमध्ये परतत आहेत. पण धीरज पाटील यांनी त्यांच्यासाठी “नो एंट्री” बोर्ड लावून, घरात परतलेल्या पंटरांचा काँग्रेसमधील परतवा धुडकावून लावला आहे.
धीरज पाटील यांच्या पत्रकाने पंटरांच्या घरवापसीला ‘लाल सिग्नल’ दिला असला तरी, दत्तू भालेराव यांच्यासाठी मात्र ‘ग्रीन सिग्नल’ दाखवला आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांचे खास कार्यकर्ते, दोन वेळा पराभूत होऊन भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले भालेराव साहेबांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आणि आपली उमेदवारी फिक्स केली!
मधुकरराव चव्हाण यांच्या पंटरच्या घरवापसीला विरोध करणारे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील, मात्र दत्तू भालेराव यांच्या घरवापसीवर चक्क “मूक नायक” झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्या निर्णयावर विरोध करण्याचं धारिष्ट धीरज पाटील यांच्या अंगी नाहीच. एकंदरीत, हे काँग्रेसचं “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा”चं अगदी साक्षात उदाहरण आहे!
तर मंडळी, या गटबाजीतून कोण विजयी होणार आणि कोणाची राजकीय गणितं उधळणार, हे बघण्यासाठी पुढील काही महिने खरोखरच ‘एंटरटेनमेंट’चे ठरणार आहेत!