प्रती ,
पोलीस अधीक्षक, धाराशिव
विषय: श्री संत नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था, वानेवाडी येथील आश्रमात झालेल्या माझ्या मृत्यूप्रकरणी तक्रार.
माननीय महोदय,
मी, प्रेम लहू शिंदे, वय वर्षे १४, वाखरवाडी येथील रहिवासी होतो. माझे वडील लहू शिंदे यांनी मला पाचवीला असताना भडाचीवाडी येथील आश्रमात सांप्रदायिक शिक्षणासाठी पाठवले होते. तेथे पाच वर्षे राहिल्यानंतर, मला घरी परतण्याची इच्छा झाली. त्यानंतर माझ्या वडिलांनी मला श्री संत नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था, वानेवाडी येथील आश्रमात दाखल केले.
वानेवाडी आश्रमात मला सुरुवातीपासूनच अमानुष वागणूक दिली जात होती. विनाकारण मारहाण, शेतात काम करण्यास भाग पाडणे, काम न केल्यास शिक्षा असे प्रकार नेहमीचे होते. एकदा तर रात्रीच्या वेळी मला जनवरासारखे मारहाण करण्यात आली. त्यामुळे मी घाबरून पळून घरी गेलो. माझ्या वडिलांना मी सर्व काही सांगितले, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मला परत त्या आश्रमात सोडावे लागले.
५ ऑगस्ट रोजी माझ्या वडिलांनी मला आश्रमात सोडले आणि ते गेले. त्यानंतर काही दिवसांनी, म्हणजेच ५ तारखेला, चौघां-पाच जणांनी मला विनाकारण बेदम मारहाण केली. दोघांनी माझे हातपाय धरले आणि उर्वरित जणांनी लाथाबुक्यांनी, काठ्यांनी माझ्या पाठीवर एवढा मार मारला की माझी पाठ काळी-निळी झाली. मी त्यांना विनवणी करत होतो, रडत होतो, माझे काय चुकले असे विचारत होतो, पण त्यांना माझी कीव आली नाही. शेवटी त्यांच्या मारहाणीतच माझा जीव गेला.
माझा मृत्यू झाल्यानंतर, आश्रम प्रशासनाने माझ्या वडिलांना कळवले नाही. त्यांनी माझे शरीर नाईट पॅन्टच्या साह्याने चिंचेच्या झाडाला लटकवले. त्यानंतर एका दलालाद्वारे माझ्या वडिलांना ही बातमी कळवण्यात आली. माझे वडील आश्रमात आले तेव्हा मी झाडाला लटकत होतो.
आज माझ्या मृत्युला १८ महिने झाले तरी मला न्याय मिळालेला नाही. माझे वडील न्यायासाठी धावपळ करत आहेत. मी फक्त १४ वर्षांचा होतो. माझा काय गुन्हा होता की मला अशी शिक्षा देण्यात आली?
मी आपणास विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. श्री संत नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था, वानेवाडी या आश्रमाची चौकशी करावी. या आश्रमात गोरगरीबांच्या मुलांना शेतात राबवले जाते, त्यांच्यावर अत्याचार केले जातात. माझ्यासारखे आणखी किती बळी जाणार आहेत? या संस्थेला कायद्याच्या कचाट्यात आणावे.
आपला विश्वासू,
प्रेम लहू शिंदे (मृत)
टीप: हे पत्र प्रेम शिंदे यांच्या वतीने लिहिण्यात आले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.