धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील जवळगा ( मेसाई ) गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बारुळ गावातून जवळगा गावाकडे जाताना काही अज्ञात गुंडांनी त्यांच्या फोर व्हिलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात सरपंच निकम हे जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्तीही जखमी झाला आहे. गुंडांनी गाडीच्या काचा फोडून गाडीवर पेट्रोल आणि अंडी टाकली.
प्राथमिक माहितीनुसार, पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी पवनचक्की गुंडांनी या गावात हैदोस घातला होता आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.दोन मोटारसायकलवरून आलेल्या गुंडानी हा हल्ला केल्याचे सरपंच नामदेव निकम यांनी सांगितले.
घटनेचा थरार
- नामदेव निकम हे मध्यरात्री गाडीने प्रवास करत असताना अचानक दोन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
- हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून आत पेट्रोल टाकले आणि गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला.
- निकम यांनी गाडीचा वेग वाढविल्याने ते बचावले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर अंडी फेकली.
पवनचक्की दादागिरीचा संशय
- पवनचक्की प्रकल्पांच्या वाढत्या दादागिरीमुळे हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
- या घटनेमुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
- या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
- पवनचक्की कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.