तुळजापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केला आहे. “हे पाप त्यांना फेडावे लागेल,” असेही त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, त्यांच्या मुलावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता, तो देखील त्याच्या आजारपणाच्या काळात.
मधुकरराव चव्हाण सध्या ९० वर्षांचे आहेत आणि मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. तरीही होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ते इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात गाव संवाद यात्रेला सुरुवात केली आहे. येवती येथे बोलताना चव्हाण यांनी हा घणाघाती आरोप केला आहे.
हेही वाचा
मधुकरराव चव्हाण यांचा गंभीर आरोप: कुटुंबातील राजकीय संघर्ष की भाजपचा दबाव?
मधुकरराव चव्हाण यांचा अजूनही तोच आग्रह – “शेवटची निवडणूक !”
नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखान्यावर १५० कोटींचे कर्ज असून, कारखाना सध्या गोकुळ संस्थेस भाड्याने दिला आहे. मात्र, चव्हाण कुटुंबच प्रत्यक्षात कारखाना चालवत असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांचे ऊस बिले प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढला होता. भाजपमध्ये प्रवेश करूनही कारखान्यास मदत न मिळाल्याने चव्हाण यांच्या मनात सल आहे.
दरम्यान, चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.