धाराशिव शहरापासून जवळ असलेल्या सारोळा गावाजवळ झालेल्या एका एसटी बसच्या अपघाताने पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बस सेवेतील गंभीर त्रुटींना वाचा फोडली आहे. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले, परंतु सुदैवाने जीवितहानी टळली. स्टेरिंग रॉड तुटल्याने बस थेट झाडावर जाऊन आदळली, आणि यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्या बसगाड्यांची अवस्था, तंत्रज्ञानातील अपुरेपणा, आणि प्रवाशांचे हाल समोर येत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील पाच एसटी डेपोत सुमारे साडेचारशे बस आहेत. परंतु, या बसपैकी ७० टक्के बसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक बस वेळोवेळी रस्त्यावर बंद पडतात, ज्यामुळे प्रवाशांना अनेक तास वाट बघावी लागते. ही समस्या फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही, तर पुणे-मुंबई मार्गावरील एसटी बस देखील याच दुरवस्थेत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्याकडे जाणारी एसटी बस १० किलोमीटर अंतर पार करताच बंद पडली होती. चार तासांनंतरही दुसरी बस उपलब्ध झाली नाही, आणि प्रवाशांना त्या अनिश्चिततेत कष्ट सहन करावे लागले.
काही महिन्यांपूर्वी पावसाळ्यात उमरगा ते डिग्गी मार्गावर गळणारी एसटी बस सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अशा घटनांमुळे एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहते. “लाल परी” म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा आता प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे. धाराशिव सारख्या जिल्ह्यांना अनेक वर्षे नवीन बस मिळाल्या नाहीत, ज्यामुळे जुन्या बसच्या देखभालीचा अभाव आहे.
सरकारने महिलांना अर्धे तिकीट प्रवास, ६५ वर्षांवरील व्यक्तींना सवलती, अधिस्वीकृती पत्रकारांना मोफत प्रवास, दिव्यांगांसाठी ५० ते ७५ टक्के सवलत यासारख्या योजना लागू केल्या आहेत. या सवलतीमुळे एसटीच्या बसमध्ये गर्दी तर होते, परंतु या गर्दीला तोंड देण्यासाठी बसगाड्या सक्षम नाहीत. या परिस्थितीत प्रवाशांची अवस्था “भीक नको पण कुत्रं आवर” अशीच झाली आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने खासगी बसचालकांनी मोठ्या प्रमाणात लूट केली. सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली तर खासगी बसवाल्यांचा मनमानी कारभार रोखता येईल. परंतु, प्रश्न हा आहे की, सरकार या गंभीर समस्येकडे लक्ष देणार आहे का? एसटी महामंडळाच्या बसगाड्या ज्या प्रकारे धोकादायक बनत आहेत, त्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
सार्वजनिक वाहतूक ही कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग आहे. जर ही वाहतूकच सुरक्षित आणि सक्षम नसली, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा धोका ठरतो. एसटी महामंडळाने या समस्यांचा तातडीने विचार करून नवीन बसगाड्या आणणे आणि जुन्या गाड्यांची योग्य देखभाल करणे अत्यावश्यक आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह