धाराशिवच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर अनोखी अदलाबदल झाली आहे! राज्य सरकारच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, धाराशिवचे अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांची बदली झाली आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे त्यांच्या जागी त्यांची पत्नी शफकत आमना यांचीच नियुक्ती झाली आहे!
गौहर हसन यांच्या बदलीनंतर त्यांना कोणतीही नवीन पोस्टिंग मिळालेली नाही, तर त्यांच्या जागी थेट त्यांच्या पत्नींनाच अपर पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शफकत आमना यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
यानंतर आता पोलिसांच्या बदल्यांचा खेळ अधिक रंगतदार ठरतोय. नवऱ्याची खुर्ची पत्नीने घेतली खरी, पण नवऱ्याची पुढची पोस्टिंग कुठे होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे! गृह विभागाच्या या अनोख्या निर्णयावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बदल्यांमागील सूत्रधार कोण आणि गौहर हसन यांना पुढे कोणती जबाबदारी दिली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.