धाराशिव : यावर्षीच्या संभाव्य पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यंत्रणांना सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात २८ फेब्रुवारी रोजी पाणी आणि चारा टंचाईच्या आढावा बैठकीत पुजार बोलत होते.
या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी, जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की, गाळ साचलेल्या विहिरींमधील गाळ काढण्याचे काम आणि नादुरुस्त असलेल्या बोअरवेलची दुरुस्ती तातडीने करावी. भूजल पातळी आणि पाणी साठ्यात वाढ करण्यासाठी यंत्रणांनी एकत्र काम करावे. तालुका यंत्रणांनी पाणी टंचाई काळात समन्वय साधून आवश्यक उपाययोजना कराव्यात. यावर्षी वृक्षारोपण मोहीम प्रभावीपणे राबवावी आणि त्यासाठी रोपवाटिका तयार कराव्यात. जल जीवन मिशनची कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करावीत.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष म्हणाले की, गेल्या वर्षी ज्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावांवर आतापासूनच लक्ष ठेवावे. नादुरुस्त हातपंप दुरुस्त करावेत, गाळ साचलेल्या विहिरींमधील गाळ काढावा. तसेच टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरची क्षमता आणि वेळेत पोहोचण्याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात २०२४ मध्ये सरासरी १२० टक्के पाऊस झाला. सीना कोळेगाव प्रकल्पात ५७ टक्के, १७ मध्यम प्रकल्पात ५२ टक्के आणि २०८ लघु प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी १०३ गावांना १५३ टँकरने पाणीपुरवठा केला गेला, तर ५०० गावांमध्ये ८५४ विहिरी व बोअरवेल नागरिकांसाठी अधिग्रहित करण्यात आले, अशी माहिती मोहन सरवदे यांनी दिली.
जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागात १ एप्रिल ते ३१ जून २०२५ पर्यंत पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, ९ प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागासाठी ४८७ गावांसाठी १३४८ उपाययोजना प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात ७,९०,३९९ पशुधन असून, त्यांना दररोज ३०८९ मेट्रिक टन वैरणाची गरज आहे, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पुजारी यांनी सांगितले. इतर अधिकाऱ्यांनीही पाणी टंचाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली.