धाराशिव: सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांसाठी धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी दिलासादायक ठरली आहे. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीत गमावलेले तब्बल १९ लाख रुपये सायबर पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे मूळ फिर्यादींना सुखरूप परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिसांच्या या धडक आणि तातडीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भावांची झाली होती १९ लाखांची फसवणूक
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील अणदूर (वत्सलानगर) येथील रहिवासी मोहित सिद्धेश्वर भुजबळ आणि रोहित सिद्धेश्वर भुजबळ या दोन भावांची ऑनलाईन भामट्यांनी फसवणूक केली होती.
सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या वापरून मोहित भुजबळ यांचे १४,००,००० रुपये (१४ लाख) आणि रोहित भुजबळ यांचे ५,००,००० रुपये (५ लाख) अशी एकूण १९ लाख रुपयांची भलीमोठी रक्कम ऑनलाईन पद्धतीने लांबवली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन्ही भावांनी तात्काळ ‘एनसीसीआर’ (NCCR) पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली.
खाती केली गोठवली; नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रक्कम केली हस्तगत
तक्रार प्राप्त होताच धाराशिव सायबर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सायबर पथकाने तातडीने संबंधित बँकांशी अधिकृत पत्रव्यवहार केला आणि फसवणुकीचे पैसे वर्ग झालेल्या आरोपींच्या विविध बँक खात्यांचा शोध घेऊन ती सर्व खाती (Accounts) तात्काळ गोठवली (Freeze).
यानंतर बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा आणि संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. परिणामी, मोहित आणि रोहित भुजबळ यांचे फसवणूक झालेले संपूर्ण १९ लाख रुपये पुन्हा त्यांच्या मूळ बँक खात्यात सुरक्षितपणे वर्ग करण्यात धाराशिव सायबर पोलिसांना यश आले.
अधिकारी व पथकाचे कौतुक
सदरची उल्लेखनीय कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कासुळे, पोलीस अंमलदार सूर्यवंशी (बकल नं. ६४०), पोलीस हवालदार हालसे (बकल नं. ११२९), पोलीस अंमलदार जाधवर (बकल नं. १०३६), महिला पोलीस अंमलदार शेख (बकल नं. ७१८), पोलीस अंमलदार बिराजदार (बकल नं. १६५), गाडे (बकल नं. ८०) आणि शिंदे (बकल नं. ९७१) यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
धाराशिव सायबर पोलिसांचे आवाहन:
“कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेला मेसेज, संशयास्पद लिंक, फोन किंवा क्यूआर कोडवर (QR Code) खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती किंवा ओटीपी (OTP) कोणालाही देऊ नका. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ ‘१९३०’ या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवून सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे संपर्क साधावा.”






