धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पौर्णिमा गायकवाड या मुलीला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास जाणवत असल्याने मंगळवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे काही तासांतच तिचा मृत्यू झाला.
डॉक्टर खासगी हॉस्पिटलमध्ये व्यस्त – शिकाऊ विद्यार्थ्यांकडून उपचार!
रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये व्यस्त असल्याने उपचारासाठी शिकाऊ विद्यार्थ्यांवर भिस्त ठेवली जात असल्याचे उघड झाले आहे. परिणामी, निष्पाप रुग्णांचे प्राण धोक्यात येत असून, ही व्यवस्थेतील गळतीच ठरत आहे.
नुकताच एका पोलिसाचा मृत्यू, त्याची शाई वाळते न वाळते तोच नवा प्रकार!
केवळ काही दिवसांपूर्वीच एका पोलिसाच्या मृत्यूने रुग्णालयातील बेजबाबदार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्याची शाई वाळते न वाळते, तोच आणखी एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे.
चौकशी समिती स्थापन – २४ तासांत अहवालाचा आदेश!
या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत महाविद्यालयाचे डीन डॉ. शैलेंद्र चव्हाण यांनी चौकशी समिती स्थापन केली असून, २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अशा चौकशी समित्यांमधून काही निष्पन्न होणार का, की ही देखील नेहमीप्रमाणे फक्त कागदोपत्री कारवाई ठरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जबाबदारांवर कारवाई होणार की नाही?
या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूंना जबाबदार कोण? प्रशासन आता काय कारवाई करणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.