धाराशिव : धाराशिव आणि बार्शीच्या सीमेवर सध्या एक नव्या प्रकारचा वन्यजीव संघर्ष सुरू आहे. एकटा वाघ ५४ दिवसांत २८ पाळीव प्राण्यांची शिकार करूनही उपाशीच राहतोय, कारण त्याच्या शिकारीवर दोन बिबटे ताव मारून जात आहेत! दोन महिन्यांपासून वाघ आणि बिबट्यांच्या या ‘सहजीवनाच्या’ खेळामुळे शेतकरी अक्षरशः थरथरत आहेत.
वाघ शिकार करतो, बिबटे खातात!
वन विभागाच्या निरीक्षणानुसार, वाघ एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर त्याच्या छातीतील रक्त पिऊन काळीज आणि मांडीचा काही भाग खातो. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच शिकारीकडे परततो, तोवर बिबटे स्वारी करून संपूर्ण उरलेलं मांस साफ करून टाकतात! यामुळे वाघाला पुन्हा नवीन शिकार करावी लागते आणि हा दुष्टचक्र सुरूच आहे.
लाखोंचा खर्च, पण वन विभागाला मिळालं काय?
वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने तब्बल दोन महिने लाखो रुपये खर्च केले, पण याचा उपयोग काहीच झाला नाही.
- ताडोबाच्या रेस्क्यू टीमने प्रयत्न करून हार मानली.
- पुण्याच्या टीमने डार्ट गनचा वापर केला, पण वाघाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
- वाघाने खाल्लेले प्राणी ट्रॅप म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर बिबट्यांनी आधीच हक्क सांगितला!
वन विभागाचा खर्च – वाघाची मौज!
वाघाला पकडण्यासाठी सापळे लावण्यात आले, ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले, पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली. पण सध्या या सर्व प्रयत्नांचा फायदा वाघ आणि बिबट्यांनाच होतोय – एक शिकार करतो, दुसरा खातो, आणि वाघ पुन्हा नवीन शिकार करतो!
शेतकऱ्यांचा संताप – “आमची जनावरं संपली, आता उपाय काय?”
कारी, चारे, येरमाळा, उक्कडगाव, चोराखळी तलाव, भानसाळे या भागातील शेतकरी पूर्णपणे धास्तावले आहेत. जनावरं रानात सोडायची हिंमत होत नाही, आणि वन विभागाच्या योजना केवळ ‘येतोय-करतोय’पुरत्याच राहिल्या आहेत.
“वाघाला पकडा की बिबट्यांना हटवा?” – वन विभाग संभ्रमात
आता प्रश्न असा आहे की, वन विभाग वाघ पकडायच्या मागे आहे, पण आधी बिबट्यांचा बंदोबस्त करायला हवा का? कारण जोपर्यंत बिबटे आहेत, तोपर्यंत वाघ नवीन शिकारी करतच राहील आणि जंगलातील हा संघर्ष चालूच राहील.
‘युती सरकार’ तोडण्यासाठी वन विभागाचा नवा डाव!
वन विभाग आता वेगळी रणनीती आखत आहे. बिबट्यांना वेगळ्या भागात नेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, जेणेकरून वाघाची शिकार तरी त्याच्याच हक्कात राहील! पण हे होईपर्यंत शेतकरी मात्र वन्य प्राण्यांच्या दहशतीखालीच आहेत.
शेवटी वाघ पकडणार कोण?
लाखो रुपये खर्च, दोन महिन्यांचा थरार, बिबट्यांचे हस्तक्षेप आणि जंगलातील राजा वाघ अजूनही मोकाट! या गोंधळात वन विभागाच्या हातात काहीच लागलेलं नाही. वाघ आणि बिबटे मात्र आनंदात आहेत – वाघ शिकारीचा राजा, आणि बिबटे संधीसाधू मांडलिक!